काँग्रेसचा केंद्रावर हल्ला; हज विमान भाडेवाढीचे परिपत्रक मागे घेण्याची मागणी..
24 प्राईम न्यूज 4 मे 2026
नवी दिल्ली हज यात्रेसाठी विमान भाड्यात करण्यात आलेल्या सुमारे १०,००० रुपयांच्या वाढीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे, अशी ठाम मागणी पक्षाने केली आहे.

काँग्रेसच्या मते, मोदी सरकारच्या कार्यकाळात हज यात्रेचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून तो आता सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जात आहे. हज समितीने जागतिक स्तरावर वाढलेल्या विमान इंधन दरांचा हवाला देत ही दरवाढ केली असली, तरी यात्रेकरूंवर अचानक आर्थिक भार टाकणे अन्यायकारक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

सरकारच्या स्पष्टीकरणानुसार, विमान कंपन्यांनी इंधन दरवाढीमुळे भाड्यात ४०० डॉलर्सपेक्षा अधिक वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, सर्व बाबींचा विचार करून ती वाढ १०० डॉलर्स (सुमारे १०,००० रुपये) इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे. तसेच ही वाढीव रक्कम १५ मेपर्यंत भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे खासदार सय्यद नसीर हुसेन यांनी या निर्णयावर आक्षेप घेत सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, कोणतीही पूर्वसूचना किंवा चर्चा न करता अतिरिक्त रक्कम मागणे चुकीचे आहे. अनेक यात्रेकरूंनी आधीच संपूर्ण रक्कम भरलेली असताना ही अचानक वाढ लादणे म्हणजे प्रशासनातील गैरव्यवस्थापनाचे उदाहरण आहे.
काँग्रेसने सरकारला सवाल करत विचारले आहे की, ऊर्जा क्षेत्र स्थिर असल्याचा दावा केला जात असताना हज यात्रेकरूंवरच अतिरिक्त भार का टाकला जात आहे? खाजगी ट्रॅव्हल ऑपरेटर्स कमी दरात सेवा देऊ शकतात, मग सरकारला ते का शक्य होत नाही?
दरम्यान, अल्पसंख्याक मंत्रालयाने सौदी अरेबियातील काही यात्रेकरूंचे व्हिडिओ शेअर करत तेथील सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले असल्याचे सांगितले आहे. यात्रेकरूंना योग्य सेवा व सन्मान देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे.
