अमळनेरमध्ये महाराष्ट्र दिनी आदर्श शिक्षकांचा गौरव; दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा व दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद जळगाव संचलित या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

जी.एस. हायस्कूल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार दादासाहेब अनिल पाटील आणि जळगाव लोकसभा खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीने विशेष शोभा आली. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना गट शिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी मांडली.

यावेळी सन २०२५-२६ या वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरविण्यात आले.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये मनिषा पाटील (जि.प. शाळा सडावण), सीमा सूर्यवंशी (डी.आर. कन्या शाळा), अनिता बोरसे (साने गुरुजी कन्या शाळा), भैय्यासाहेब साळुंखे (जि.प. शाळा गडखांब), रोहिणी बडगुजर (जि.प. शाळा मुडी), सुवर्णा वाणी (जि.प. शाळा मेहरगाव), प्रभाकर पाटील (जि.प. शाळा चिमणपुरी), अनिल चौधरी (माध्यमिक विद्यालय निम), बापुराव सांगोरे (माध्यमिक आश्रम शाळा रणाईचे), आनंदा धनगर (माध्यमिक शाळा करणखेडा) आणि शोभा कसबे (डी.आर. कन्या शाळा) यांचा समावेश होता.
कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत शिक्षण विभागासह सॅम शिंगाणे, कमलेश मोरे, सुनील करंदीकर, सचिन वाघ आणि भूपेंद्र सर यांनी विशेष सहकार्य केले.
