आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते अमळनेरमध्ये ‘स्व-गणने’चा शुभारंभ; नागरिकांना १५ मेपूर्वी ऑनलाइन नोंदणीचे आवाहन..

0
New-Doc-05-02-2026-06.44.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – भारत सरकारच्या ‘जनगणना २०२७’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत अमळनेर शहरात ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, मा. आमदार अनिल पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, नगरसेवक तसेच अमळनेर नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः ऑनलाइन नोंदणी करून आदर्श निर्माण केला.


‘आमची जनगणना, आमचा विकास’ या ध्येयवाक्याखाली प्रथमच नागरिकांना मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून स्वतःची माहिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित मान्यवरांनी se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली व कुटुंबाची माहिती भरून ‘SE ID’ प्राप्त केला.
यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, “शहराच्या पुढील दहा वर्षांच्या विकास आराखड्यासाठी जनगणनेतील माहिती अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने १५ मेपूर्वी ‘स्व-गणना’ पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे.”


नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “ऑनलाइन नोंदणीनंतर मिळणारा ‘SE ID’ सुरक्षित ठेवावा. १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी येतील, तेव्हा फक्त हा आयडी दिल्यास सर्वेक्षण प्रक्रिया सुलभ होईल आणि वेळेची बचत होईल.”
१५ मेपर्यंत सुरू राहणाऱ्या या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमळनेर नगरपरिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शहराची अचूक व संपूर्ण माहिती शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed