बोरी नदीतील नवीन भूमिगत जलवाहिनीचा प्रस्ताव रखडला; निधी अन्य कामांकडे वळवल्याचा आरोप.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बोरी नदीपात्रातील जुन्या मुख्य जलवाहिनीऐवजी नवीन भूमिगत जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव मंजूर होऊनही प्रत्यक्षात राबविण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या “वैशिष्ट्यपूर्ण” योजनेअंतर्गत मंजूर झालेला निधी मूळ उद्देशाऐवजी अन्य विकासकामांकडे वळविण्यात आल्याचा दावा संबंधित कागदपत्रांच्या आधारे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दि. १७ नोव्हेंबर २०१७ च्या “वैशिष्ट्यपूर्ण” योजनेअंतर्गत अमळनेर नगरपरिषदेला दि. ३ ऑक्टोबर २०१८ रोजी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून कोणती विकासकामे करावीत, याचा निर्णय घेण्याचे अधिकार नगरपरिषदेला देण्यात आले होते.
त्यानुसार नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने दि. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी ठराव क्रमांक ६०७ मंजूर करून दोन महत्त्वाच्या कामांना प्राधान्य दिले होते. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १३ मधील जीर्ण ७ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाऐवजी १० लाख लिटर क्षमतेचा नवीन जलकुंभ उभारणे आणि बोरी नदीपात्रातील जुन्या मुख्य जलवाहिनीऐवजी नवीन भूमिगत जलवाहिनी टाकणे या कामांचा समावेश होता. या दोन्ही प्रस्तावांना प्रशासकीय मान्यतेसाठी संबंधित विभागांकडे पाठविण्यात आले होते.
मात्र, नंतर या कामांऐवजी शहरातील मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार उभारणे व इतर विकासकामांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ही कामे नगरपरिषदेमार्फत न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
या निर्णयाविरोधात मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (सध्याचे संभाजीनगर) खंडपीठात रिट पिटीशन क्रमांक ३६८२/२०१९ दाखल करण्यात आली होती. दि. १५ मे २०२० रोजी न्यायालयाने शासनाचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे नमूद करत संबंधित प्रशासकीय मान्यता आदेशांना स्थगिती दिल्याचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, अलीकडील पुरामुळे बोरी नदीतील जुनी जलवाहिनी पुन्हा नुकसानग्रस्त झाल्याने अमळनेर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. २०१८ मध्ये प्रस्तावित नवीन भूमिगत जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण झाले असते, तर आजची पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या मोठ्या प्रमाणात टाळता आली असती, असा दावा माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केला आहे.
