नंदुरबारमध्ये ‘उर्दू घर’ मुस्लिम अल्पसंख्यांक भवनासाठी मागणी..
24 प्राईम न्यूज 1 May 2026
नंदुरबार – जिल्ह्यातील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी ‘उर्दू घर’ अथवा मुस्लिम अल्पसंख्यांक भवन मंजूर करण्यात यावे, अशी मागणी इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष एजाज बागवान यांनी यासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नंदुरबार जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र भवनाची आवश्यकता आहे. या प्रस्तावित ‘उर्दू घर’मध्ये अत्याधुनिक ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कॉन्फरन्स हॉल, संगणक कक्ष, मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय, तसेच स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास (स्किल डेव्हलपमेंट) वर्गांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय अल्पसंख्यांक समाजाशी संबंधित विविध शासकीय योजना व कार्यालयांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास समाजाच्या प्रगतीला चालना मिळेल, असेही निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या टोकरतलाव रस्त्यावर स्थलांतरित झाल्यामुळे जुनी इमारत रिक्त आहे. ही इमारत मुस्लिम बहुल परिसरात असल्याने त्या ठिकाणी ‘उर्दू घर’ उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, तसेच अल्पसंख्यांक मंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक घेऊन शासनाकडून निधीची तरतूद करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना रियाज कुरेशी, नासीर मन्यार, जावेद अहमद, अमीन कुरेशी, शेख मुस्तफा, दानिश बागवान आदी उपस्थित होते.
