५० हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; अमळनेरमध्ये कारवाई..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील नगाव बु. येथील ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र देविदास पवार (वय ४८) यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या चुलत भावाला १५ वा वित्त आयोग अंतर्गत नगाव बु. येथे सीसी गटार बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविण्याची सुमारे १२ लाख रुपयांची दोन कामे मिळाली होती. संबंधित कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र पवार यांनी बिलाच्या रकमेच्या ७ टक्के प्रमाणे ८४ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने याबाबत ३० एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पंचासमक्ष सापळा रचण्यात आला.
दरम्यान, आरोपीने यापूर्वीच फोन पे द्वारे १३ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. त्यानंतर तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. अमळनेर शहरातील केलेनगर परिसरातील आरोपीच्या राहत्या घरी सापळा राबविण्यात आला. यावेळी आरोपी रविंद्र पवार हे ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी सापळा यशस्वी केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.
या कारवाईमुळे शासकीय यंत्रणांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
नागरिकांनी कुठल्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
टोल फ्री क्रमांक : १०६४
व्हॉट्सअॅप : ७५८८६६१०६४
वेबसाईट : acbmaharashtra.gov.in
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 148400
22 Ct सोने 91.60% : ₹. 136500
18 Ct सोने 75.00% : ₹. 112800
शुद्ध चांदी 999%:₹. 2430/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
