‘खरात’ प्रकरणानंतर महाराष्ट्रात भोंदूगिरीवर मोठा घाव; महिनाभरात १४ भोंदूबाबे गजाआड..

0
New-Doc-05-01-2026-06.52.jpg


24 प्राईम न्यूज 1 मे 2026
नवी मुंबई आणि नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, या घटनेनंतर राज्यभरात भोंदूबाबांविरोधात मोठी मोहीम उभी राहिल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकरणामुळे अनेक पीडितांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत मिळाली असून, मागील अवघ्या ३० दिवसांत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पुढाकारातून राज्यभरात तब्बल १४ भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघड
या कारवाईदरम्यान अनेक भोंदूबाबांकडून महिलांचे लैंगिक शोषण, तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ग्रामीण भागांसह शहरी भागातही अशा भोंदूगिरीचे जाळे पसरले असल्याचे या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.
अंनिसची ठोस भूमिका; पीडितांना पुढे येण्याचे आवाहन.


शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रयत्नातून २०१३ मध्ये लागू झालेल्या ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ असूनही अशा घटना घडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, अॅड. रंजना गवांदे आणि विष्णू लोणारे यांनी स्पष्ट केले की,
“भीतीमुळे शांत राहणे म्हणजे गुन्हेगारांना प्रोत्साहन देणे होय. पीडितांनी न घाबरता पुढे येऊन पोलिसांत तक्रार करावी.”
‘खरात’ प्रकरणामुळे वाढली धाडसाची भावना
अशोक खरात प्रकरणानंतर अनेक पीडित महिलांमध्ये न्याय मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे. काही ठिकाणी स्वतःहून तर काही ठिकाणी अंनिसच्या मदतीने गुन्हे दाखल झाले आहेत. या मोहिमेमुळे समाजात जागृती वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
महिनाभरात कारवाई झालेले भोंदूबाबे
अशोक कुमार खरात – नाशिक
राजेंद्र गडगे (गडगेबाबा) – संगमनेर, अहिल्यानगर
चेतन सुनील माळी – मूर्तिजापूर, अकोला
पंकज देवराम घोलप – येडगाव, पुणे
मनोहर भोसले – कुरुडवाडी, सोलापूर
नाना बर्डे – आळे फाटा, पुणे
ऋषिकेश वैद्य – वसई, मुंबई
अल्ताफ रईस खान – मालाड, मुंबई
रिधम पांचाळ – मालाड, मुंबई
गणेश शिंदे – श्रीरामपूर, अहिल्यानगर
अर्जुन चव्हाण (टनटन बाबा) – नवी मुंबई
विठोबा वाल्मीक जाट – सातपूर, नाशिक
किसन तळपे – मंदोशी, खेड
महेशगिरी (महेश काकडे) – निफाड, नाशिक
या प्रकरणांमुळे अंधश्रद्धेविरोधातील लढा अजून तीव्र करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. कायदा अस्तित्वात असतानाही भोंदूगिरी सुरू असल्याने समाजाने जागरूक राहणे आणि संशयास्पद बाबींची तक्रार करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
(टीप : ही बातमी जनजागृतीच्या उद्देशाने असून, नागरिकांनी कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता कायद्याचा आधार घ्यावा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed