अमळनेर बसस्थानकाजवळ ‘नो पार्किंग’चा फज्जा; धुळे रोडवर वाहतूक कोंडीचा त्रास..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : शहरातील बसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग’ झोनमध्ये सर्रास वाहनं उभी केली जात असल्यामुळे मुख्य धुळे रोडवर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत ही समस्या अधिक तीव्र होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बसस्थानकाजवळ प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षा ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभ्या केल्या जात असल्याने रस्ता अरुंद होतो. परिणामी, एसटी बस, शालेय बस, रुग्णवाहिका आणि इतर वाहनांना मार्ग काढताना अडचणी येतात.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून कारवाई केली जात असली तरी ती सातत्याने होत नसल्याने वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. काही व्यावसायिक आस्थापनांसमोरही ग्राहकांची वाहनं रस्त्यावरच उभी केली जात असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होते.

यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून पादचारीही असुरक्षित झाले आहेत. विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना विशेष अडचणींचा सामना करावा लागतो.
नागरिकांनी प्रशासनाकडे या भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यात स्पष्ट ‘नो पार्किंग’ फलक, कडक दंडात्मक कारवाई, तसेच वाहतूक नियोजनासाठी पोलिसांची कायम उपस्थिती ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन कडक उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 149200
22 Ct सोने 91.60% : ₹. 137300
18 Ct सोने 75.00% : ₹. 113500
शुद्ध चांदी 999%:₹. 2420/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
