अमळनेरात युवासेना–शिवसेनेचे भव्य रक्तदान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : मा. श्री. प्रतापभाऊ गुलाबरावजी पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त युवासेना–शिवसेना, अमळनेर यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत मोठ्या संख्येने युवक-युवतींसह विविध स्तरांतील नागरिकांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत रक्तदान केले.
“रक्तदान हेच खरे जीवनदान” या संदेशाला साकार रूप देत प्रत्येक रक्तदात्याने समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. या शिबिरातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला. शिबिरादरम्यान युवकांची एकजूट, सेवाभाव आणि समाजाभिमुख दृष्टिकोन प्रकर्षाने दिसून आला.

या उपक्रमात युवासैनिकांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, रक्तदानाबाबत जागरूकता वाढविण्यासाठीही या शिबिराने महत्त्वाची भूमिका बजावली.
युवासेना तालुकाप्रमुख राहुल कंजर, शहरप्रमुख प्रवीण पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्व रक्तदाते, कार्यकर्ते तसेच सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. पुढील काळातही अशाच प्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमांद्वारे गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
