अमळनेरात 14 मे रोजी “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य”संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनतर्फे भव्य सादरीकरण; २५० कलाकारांचा सहभाग..

0
New-Doc-04-27-2026-06.40.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १४ मे रोजी अमळनेर शहरात “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य”चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने आणि जयनिल फाऊंडेशनच्या सहकार्याने हे महानाट्य छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सादर होणार आहे.


या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना जयनिल फाऊंडेशनचे गौतम पाटील यांनी सांगितले की, सामाजिक जाणीव वाढवणे आणि विविध क्षेत्रातील उणिवा भरून काढण्यासाठी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून या महानाट्याच्या माध्यमातून संस्थेच्या कार्याचा प्रारंभ करण्यात येत आहे.


संस्कृती फाऊंडेशनचे नाट्यकलाकार निकेश राजपूत यांनी सांगितले की, या महानाट्यात सुमारे २५० कलाकारांचा सहभाग असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य व बलिदानाची गाथा सजीव स्वरूपात सादर केली जाणार आहे. सात्विक ठकार लिखित व राकेश राजपूत दिग्दर्शित या महानाट्यात उत्तर महाराष्ट्रातील कलाकारांचा मोठा सहभाग असून त्यापैकी १०० हून अधिक कलाकार अमळनेर व परिसरातील आहेत. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नंदुरबार व धुळे येथे या महानाट्याचे यशस्वी प्रयोग पार पडले असून अमळनेरात चौथा व पाचवा प्रयोग होणार आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून स्थानिक कलाकारांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रेक्षकांना “लाईव्ह इतिहास” अनुभवता यावा यासाठी विशेष सादरीकरणाची तयारी करण्यात आली आहे.
या उपक्रमाला आमदार अनिल पाटील व जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही निकेश राजपूत यांनी नमूद केले. तसेच या महानाट्याच्या माध्यमातून जळगाव व अमळनेर येथे “संस्कृती कला विद्यालय” स्थापन करण्याचा मानस असून त्यात स्थानिक कलाकारांना अभिनय, व्यक्तिमत्व विकास व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तरुणाईला विशेष आवाहन
गौतम पाटील यांनी सांगितले की, जयनिल फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, रोजगार मेळावे, व्यक्तिमत्व विकास, शेतकऱ्यांना प्रोत्साहन, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात काम केले जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज हे तरुणाईचे आदर्श असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक विशेष प्रयोग राखीव ठेवण्यात आला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी कार्यालयातून पासेस घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला नयना कुलकर्णी यांच्यासह संस्कृती फाऊंडेशनचे कलाकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed