सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे; चौथ्या दिवशी तोडगा..
24 प्राईम न्यूज 25 एप्रिल 2026
मुंबई : सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह विविध प्रलंबित १८ मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आला. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक

आश्वासनांमुळे समन्वय समितीने हा निर्णय घेतला.
राज्यातील सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २१ एप्रिलपासून संप पुकारला होता. या संपाचा सर्वाधिक परिणाम महसूल विभागावर झाला असून मुद्रांक नोंदणी, जमीन व घर खरेदी व्यवहार तसेच विवाह नोंदणीची कामे ठप्प झाली होती.

दरम्यान, मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीतील आश्वासनांचे अधिकृत इतिवृत्त देण्याची मागणी समन्वय समितीकडून करण्यात आली होती. आज ते मिळाल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबत लवकरच निर्णय होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आणि शासकीय सेवा सुरळीत ठेवण्यासाठी हा संप मागे घेण्यात आला असल्याचे समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी स्पष्ट केले.
