अमळनेर तालुक्यात पेट्रोल टंचाई नाही; अफवांमुळे अनावश्यक गर्दी — पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यात कुठेही पेट्रोलची टंचाई नसून काही पेट्रोल पंपांवर माल संपल्यानंतर एक-दोन दिवस पंप बंद राहत असल्याने नागरिकांमध्ये गैरसमज पसरत आहे. या गैरसमजामुळे ग्राहक विनाकारण जादा पेट्रोल भरून घेत असल्याने इतरांना टंचाईचा भास होत असल्याचे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरातील प्रशांत निकम यांच्या शिव पेट्रोल पंपाबाबत बनावट सायबर क्राईमच्या तक्रारी दाखल झाल्याने सायबर गुन्हे शाखेकडून त्यांच्या तीन बँक खाती गोठविण्यात आली आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांना रोखीने पेट्रोल मागवता येत नसून संबंधित पंप तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, प्रत्येक पेट्रोल पंपाला ठराविक दिवसांनुसार मर्यादित साठा पुरवला जातो. त्यामुळे एखादा पंप बंद असल्यास इतर पंपांवर गर्दी वाढून पेट्रोल लवकर संपते. तसेच रुग्णवाहिका, पोलिस आणि प्रशासकीय वाहनांसाठी अत्यावश्यक साठा राखून ठेवण्याचे आदेश असल्याने काही प्रमाणात पेट्रोल राखीव ठेवले जाते. यामुळे काही ग्राहकांमध्ये ‘पेट्रोल असूनही देत नाहीत’ असा गैरसमज पसरत आहे.
सध्या सुरुवातीला नायरा पंपावर पेट्रोल उपलब्ध होते, तर आर.के. पेट्रोल पंप बंद होते. आता नायरा पंपावरील साठा संपला असून आर.के.चे दोन्ही पंप सुरू झाले आहेत. तसेच बोहरी पंपावरही नियमित पेट्रोल वाटप सुरू आहे. नायरा पंपाला पेट्रोल मुंबईहून येत असून सर्व पंपांना कोट्यानुसार पुरवठा केला जात आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरजेपुरतेच पेट्रोल घ्यावे, असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख यांनी केले आहे. पंपांवर प्रशासनाने प्रत्यक्ष तपासणी केली असून काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पेट्रोल संपल्यास लवकरच नवीन साठा उपलब्ध होत असल्याने कुठल्याही प्रकारची अधिकृत टंचाई नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152000
22 Ct सोने 91.60% : ₹. 139800
18 Ct सोने 75.00% : ₹. 115500
शुद्ध चांदी 999%:₹. 2490/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
