अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा पारंपरिक शुभारंभ.

अमळनेर /आबिद शेख
वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा पारंपरिक पद्धतीने उत्साहात शुभारंभ करण्यात आला. स्तंभारोपण व अन्नपूर्णा खांबाचे पूजन करून या यात्रेची सुरुवात करण्यात आली असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

यात्रोत्सवाची सुरुवात सकाळी वाडी संस्थान येथे हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणी पूजनाने झाली. त्यानंतर भालदार-चोपदारांच्या उपस्थितीत तसेच वारकरी शाळेतील विद्यार्थ्यांच्या टाळ-नृत्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक नदी पात्रात पोहोचल्यानंतर अभय देव यांच्या हस्ते अन्नपूर्णा खांबाचे विधिवत पूजन करून तो रोवण्यात आला. संपूर्ण यात्रेत अन्नाची कमतरता भासू नये, याचे प्रतीक म्हणून अन्नपूर्णा खांबाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.

यानंतर संत सखाराम महाराज समाधी मंदिरासमोर ध्वजारोहण करण्यात आले. जय देव यांच्या हस्ते पूजन करून स्तंभारोपणाची विधी पार पडली. या वेळी पुजारी केशव पुराणिक, सारंग पाठक, जयंत कौंडिण्य, अभय जोशी, चारुदत्त जोशी व सुनील देव यांनी मंत्रोच्चारात पूजा विधी पूर्ण केली.
या प्रसंगी हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय अधिकारी तसेच भक्तगणांना प्रसाद देऊन यात्रोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. कार्यक्रमाला आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यात्रोत्सवाच्या शुभारंभामुळे अमळनेर शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण पसरले असून पुढील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 153400
22 Ct सोने 91.60% : ₹. 141100
18 Ct सोने 75.00% : ₹. 116600
शुद्ध चांदी 999%:₹. 2540/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
