जळगावात रिक्षा चोरीचा पर्दाफाश; आरोपी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात, चोरीची रिक्षा जप्त..
जळगाव/प्रतिनिधी
जळगाव : शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातून चोरीस गेलेल्या रिक्षा प्रकरणाचा जिल्हापेठ पोलिसांनी यशस्वी छडा लावत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी जळगाव येथील सिव्हील हॉस्पिटलच्या गेट क्रमांक ३ मधील पार्किंगमधून MH19 BJ 4025 क्रमांकाची तीनचाकी अॅपे (पॅजो) रिक्षा चोरीस गेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्र. १०१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हापेठ पोलिसांनी विशेष पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. तपासादरम्यान कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (वय ३२) रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव हा संशयित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिस पथकाने पेट्रोलिंगदरम्यान पांडे डेअरी चौकाजवळील एमएसईबी कार्यालयाजवळ संशयित रिक्षा आढळून आली. पोलिसांनी तत्काळ रिक्षा थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपली ओळख कल्पेश इंगळे अशी सांगितली. पुढील चौकशीत त्याने सदर रिक्षा सिव्हील हॉस्पिटल परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून अंदाजे ७५ हजार रुपये किमतीची काळ्या-पिवळ्या रंगाची MH19 BJ 4025 क्रमांकाची रिक्षा जप्त केली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मिलिंद सोनवणे, कमलेश पवार, तुषार पाटील, गोविंद साबळे, नरेंद्र दिवेकर आणि प्रवीण जाधव यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 153400
22 Ct सोने 91.60% : ₹. 141100
18 Ct सोने 75.00% : ₹. 116600
शुद्ध चांदी 999%:₹. 2540/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
