अमळनेरात विसाव्या समर क्रिकेट कॅम्पचे जल्लोषात उद्घाटन; पहिल्याच दिवशी ५० खेळाडूंचा सहभाग..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : जैन स्पोर्ट्स व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विसाव्या समर क्रिकेट कॅम्पचे आज अमळनेरात उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

क्रिकेटप्रेमी मुला-मुलींसाठी आयोजित या कॅम्पला पहिल्याच दिवशी तब्बल ५० खेळाडूंनी सहभाग नोंदवून उत्तम प्रतिसाद दिला.
या कॅम्पच्या माध्यमातून ग्रामीण व शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा उद्देश असून, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाच्या बारकाव्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर क्रिकेटची गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

यावेळी अकॅडमीचे प्रशिक्षक संजय पवार यांनी सांगितले की, “आमच्या अकॅडमीतील विविध वयोगटातील आठ मुले व दोन मुली सध्या पुणे येथे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या सिलेक्शन ट्रायलसाठी गेले आहेत. त्यामधून किमान दोन ते तीन खेळाडू निवडले जातील, असा आम्हाला विश्वास आहे.”
ते पुढे म्हणाले की, “या ट्रायलमध्ये सहभागी होण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या खेळाडूंमध्ये आपल्या मुलांचे स्थान काय आहे, हे जाणून घेणे आणि त्यानुसार त्यांना पुढील प्रशिक्षण देणे.”
कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली. हा कॅम्प आगामी काही दिवस सुरू राहणार असून, अमळनेरातील क्रिकेट क्षेत्रासाठी तो एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
