अमळनेरात ‘आखाजी महोत्सव’चे भव्य आयोजन; खान्देशी संस्कृतीचा जल्लोष १७ एप्रिलला..
अमळनेर /आबिद शेख
खान्देशातील सण-उत्सवांची समृद्ध परंपरा जपण्यासाठी आणि नवीन पिढीला आपल्या मुळांची ओळख करून देण्यासाठी खान्देश साहित्य संघाच्या वतीने अमळनेर येथे प्रथमच भव्य ‘आखाजी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एल.आय.सी. कॉलनी, लक्झरी बस स्टॉप समोर, धुळे रोड येथे पार पडणार आहे.

‘अक्षय्य तृतीया’ अर्थात ‘आखाजी’ हा केवळ सण नसून खान्देशी संस्कृतीचा कणा मानला जातो. याच दिवशी अहिराणी वाङ्मय दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवातून खान्देशी लोककला, पारंपरिक गाणी आणि संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी (केंद्रीय अध्यक्ष, खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र) राहणार असून उद्घाटन मा. राजेश पांडे (प्रदेश सरचिटणीस, भाजपा) यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून श्री. अशोक आधार पाटील (सभापती, कृ.उ.बा.स., अमळनेर) कार्यभार सांभाळणार आहेत.

तसेच ‘ग्रामीण संस्कृती आणि आखाजी महोत्सव’ या विषयावर प्रा. डॉ. योगिता पाटील (अहिराणी लेखिका, धुळे) मार्गदर्शन करणार आहेत.
महोत्सवात महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खापरावरील पूर्ण पोळ्या बनविणे, झोक्यावर अहिराणी गीते, गौराई गाणी, घट्यावरील गाणी, पारंपरिक वेशभूषा तसेच ‘एक मिनिटात उखाणे’ अशा स्पर्धांचा समावेश आहे. विजेत्यांना प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यासोबतच अहिराणी भाषा व संस्कृतीवर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून अस्सल खान्देशी खाद्यपदार्थ व विविध वस्तूंचे स्टॉलही महोत्सवात उभारले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, डॉ. बी.एस. पाटील, शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

खान्देश साहित्य संघाला साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कृष्णा आनंदा पाटील, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष पाटील, कवी हिरामण कंखरे, गोकुळ बागुल, शाहीर नाना पाटील आणि भाऊसाहेब देशमुख यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
