अमळनेरात मोकाट जनावरांचा हैदोस; वासरांच्या मृत्यूंनी संताप — बजरंग दलाचा प्रशासनाला इशारा!
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरात मोकाट जनावरांचा वाढता सुळसुळाट आणि जनावरे चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले असून, परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक व मुख्याधिकाऱ्यांना जोरदार निवेदन देण्यात आले.

निवेदनात शहरातील भीषण वास्तव मांडण्यात आले आहे. सार्वजनिक रस्त्यांवर मोकाट गायी वासरांना जन्म देत असून, या निष्पाप वासरांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या आठवड्यात अशा घटनांमध्ये तब्बल ५ वासरांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
याशिवाय, जनावरे चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “प्रशासन झोपेत आहे का?” असा थेट सवाल उपस्थित करत तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर बजरंग दलाचे संजय शहा (प्रखंड अध्यक्ष), सचिन चौधरी (प्रखंड मंत्री), सचिन महाजन (प्रखंड संयोजक), नरेश पाटील, नरेश आहुजा, योगराज चव्हाण, पवन बुरी, विजय वारी, अमोल महाजन, विजय पाटील, सागर वारी, परेश उदेवाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रमुख मागण्या :
मोकाट जनावरांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी
जनावरे चोरीच्या प्रकरणांचा सखोल तपास करून दोषींना अटक करावी
जनावरांच्या मालकांना ४ दिवसांत जनावरे गोठ्यात बांधण्याची नोटीस द्यावी
मुदतीनंतर रस्त्यावर आढळणारी जनावरे जप्त करून कोंडवाडा/गोशाळेत हलवावीत
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
