अमळनेरात व्यापाऱ्यावर हल्ला; गुन्हा दाखल करण्यासाठी व्यापाऱ्यांचा आक्रमक पवित्रा..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर शहरातील न्यू प्लॉट परिसरात असलेल्या ‘रिषभ फर्निचर’ दुकानाचे मालक प्रतीक जैन यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी व्यापारी बांधवांनी केली आहे. यासाठी आमदारांसह पोलीस प्रशासनाला निवेदन देत संताप व्यक्त करण्यात आला.

घटनेनुसार, ३१ मार्च २०२६ रोजी प्रतीक जैन व त्यांचे वडील कैलास जैन दुकानात असताना संजय दुसाने आणि त्याच्यासोबत आलेल्या एका महिलेने दुकानात घुसून पैशांची मागणी केली. यावेळी प्रतीक जैन यांना मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली तसेच दुकानात नासधूसही करण्यात आली. या प्रकारात प्रतीक यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून कैलास जैन यांच्याशीही वाद घालण्यात आला.

विशेष म्हणजे, कोणताही व्यवहार नसताना विनाकारण पैशांची मागणी व मारहाण केल्याचा आरोप जैन यांनी केला आहे. त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली असता, पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल न करता अदखलपात्र नोंद घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पोलीस ठाण्यातही संबंधित महिलेने धमकी दिल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणामुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. संबंधित आरोपींवर कठोर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांनी निवेदन स्वीकारून व्यापाऱ्यांना धीर दिला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी डीवायएसपी विनायक कोते व पोलीस निरीक्षकांची भेट घेऊनही निवेदन सादर केले. यावेळी शहरातील मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 150500
22 Ct सोने 91.60% : ₹. 138500
18 Ct सोने 75.00% : ₹. 114400
शुद्ध चांदी 999%:₹. 2410/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
