अमळनेरमध्ये उन्हाळी पीक पाहणी प्रयोगाला सुरुवात; शेतकऱ्यांना वेळेत नोंदणीचे आवाहन.
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : उन्हाळी हंगाम २०२६ साठी पीक पाहणी प्रयोगाला ८ एप्रिलपासून शुभारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली असल्यास विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पीक पाहणी मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी केले आहे.

पीक विमा, नुकसान भरपाई, आपत्तीमुळे होणारे नुकसान (पाऊस, वादळ इत्यादी) यासाठी वेळेवर मदत मिळावी, तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक पाहणी अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच किमान आधारभूत किमतीने शेतीमाल विक्री, पीक कर्ज सुविधा, तसेच अॅग्री स्टॅक योजनेअंतर्गत विविध अनुदाने व लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर पीक पेरा नोंद करणे गरजेचे आहे.

उन्हाळी पिकांची नोंद करण्यासाठी प्ले स्टोअरवर डीसीएस (DCS) अॅप उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ते डाउनलोड करून ऑनलाईन पद्धतीने पीक पाहणी नोंदवावी. ८ एप्रिलपासून पीक पाहणी नोंदणीला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे उन्हाळी हंगामात पिकांची लागवड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी अचूक व वेळेत पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
