शालार्थ आयडी घोटाळा: अमळनेर तालुक्यातील अनेक शाळांना नोटीस; चौकशीला वेग..

0
New-Doc-04-09-2026-06.54.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारत चौकशीला वेग दिला आहे.

या प्रकरणी दुसऱ्या दिवशीही अमळनेर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून संबंधितांकडून कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या या चौकशीत शालार्थ आयडी संदर्भातील अनियमितता, बनावट नोंदी, तसेच आर्थिक गैरव्यवहाराच्या शक्यतांची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे संबंधित शाळांमध्ये खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्या शाळांना नोटीस देण्यात आली आहे त्यामध्ये
शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे;
सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय;
सानेगुरुजी कन्या विद्यालय;
जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय;
अल्फाईज उर्दू हायस्कूल;
दत्त विद्यामंदिर, पातोंडा;
जिजाऊ विद्यालय, भिलाली;
सरस्वती विद्यालय, पाडसे;
उदय माध्यमिक विद्यालय, झाडी;
शिवाजी हायस्कूल, तांबेपुरा;
चौबारी माध्यमिक विद्यालय;
एन. टी. मुंदडा हायस्कूल;
पंडित नेहरू विद्यालय, फापोरे;
माध्यमिक विद्यालय, निंभोरा;
टाकरखेडा माध्यमिक विद्यालय आदींचा समावेश आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या शाळांमधील शालार्थ आयडी तयार करताना नियमांचे उल्लंघन झाले असल्याची प्राथमिक शंका व्यक्त करण्यात येत आहे. काही प्रकरणांमध्ये पात्रतेची पूर्तता न करता आयडी तयार करण्यात आल्याचीही शक्यता तपासली जात आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना ठरावीक मुदतीत सर्व आवश्यक कागदपत्रे, नियुक्ती प्रक्रिया, वेतन नोंदी व शालार्थ आयडी संदर्भातील माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असून, संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हाभराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed