अमळनेर यात्रोत्सव २०२६: प्रशासनाची जोरदार तयारी; आमदार शिरीषदादा चौधरी व नगराध्यक्ष बाविस्कर यांची पाहणी…
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : खान्देशाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सव २०२६ चा उत्साह शिगेला पोहोचला असून, प्रशासनाने सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे. यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी आमदार शिरीषदादा चौधरी आणि नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी बोरी नदी पात्रातील यात्रा स्थळ तसेच मंदिर परिसराची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक यात्रेसाठी येणार असल्याने नियोजन अधिक काटेकोर करण्यात येत आहे. मार्गव्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि गर्दी नियंत्रण यावर विशेष भर देण्याच्या सूचना आमदार चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. “अमळनेरची यात्रा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून खान्देशच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नगराध्यक्ष बाविस्कर यांनी नगरपालिका प्रशासनाला शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. यात्रा परिसरात हायमास्ट दिवे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, तात्पुरती आरोग्य केंद्रे व रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, यात्रेकरूंना अडथळा होऊ नये म्हणून अतिक्रमण हटवण्यावरही भर देण्यात येत आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून सीसीटीव्ही देखरेख, साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढविणे तसेच पाळणे, खेळणी व दुकानांची सुरक्षा तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यंदाच्या यात्रोत्सवातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये २७ एप्रिल रोजी रथोत्सव आणि १ मे रोजी पालखी सोहळ्याचा समावेश असून, या सोहळ्यांना मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी सामाजिक कार्यकर्ते, नगरपालिका पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या तयारीमुळे यंदाची यात्रा अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भक्तिमय वातावरणात पार पडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 149000
22 Ct सोने 91.60% : ₹. 137100
18 Ct सोने 75.00% : ₹. 113300
शुद्ध चांदी 999%:₹. 2390/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
