खरात प्रकरणाला राजकीय कलाटणी; राऊत विरुद्ध पाटील सामना संजय राऊत दुसरे खरात’ – आमदार अनिल पाटील यांचा आरोप..
जळगाव/प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात आधीच खळबळ उडाली असताना, आता या प्रकरणाला राजकीय रंग चढताना दिसत आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अनिल पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले की, काही नेते दिशाभूल करणारी विधाने करत असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या काही दिवसांत संजय राऊत यांनी महायुतीतील काही आमदार भाजपमध्ये जाण्याच्या शक्यतेबाबत विधान केले होते. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, इतर पक्षांवर टीका करण्यापेक्षा संबंधित नेत्यांनी आपल्या पक्षातील अंतर्गत घडामोडींवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या पक्षातीलच काही नेते इतर पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अशोक खरात प्रकरण गंभीर स्वरूपाचे असताना त्यावरून राजकीय वक्तव्ये होत असल्याने विविध स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याची टीकाही होत असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
