नाशिकमध्ये ‘खरात पॅटर्न’ पुन्हा उघड; खंडणी टोळीचा पर्दाफाश, फिर्यादीच निघाला आरोपी…

0
New-Doc-04-05-2026-06.51-1.jpg


नाशिक |प्रतिनिधी.
नाशिक शहरात भोंदू अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा ‘खरात पॅटर्न’चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १२ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात नाट्यमय वळण घेत फिर्यादीच आरोपी ठरल्याने खळबळ उडाली आहे.


हार्ड डिस्क चोरीतून उघड झाला मोठा कट
दोन दिवसांपूर्वी सातपूर पोलीस ठाण्यात हार्ड डिस्क चोरीची तक्रार दाखल झाली होती. तपासादरम्यान ही हार्ड डिस्क संबंधित कार्यालयातीलच कर्मचाऱ्याने चोरल्याचे उघड झाले. या हार्ड डिस्कमध्ये सुमारे १०० पेक्षा अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे समोर आले.
चोरीनंतर या व्हिडिओंचा आधार घेत संबंधित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळले. सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या संशयितांनी नंतर रक्कम वाढवत थेट १२ लाखांपर्यंत नेली होती.
चार आरोपी अटकेत, साहित्य जप्त
सातपूर पोलिसांनी कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी संबंधित व्यावसायिकाच्या कार्यालयातच काम करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी


या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खंडणी प्रकरणातील फिर्यादी रवींद्र एकनाथ एरंडे (वय ६३, रा. अशोकनगर, सातपूर) याच्याविरोधात एका महिलेने गंभीर तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, एरंडेने महिलांना आमिष दाखवत त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले. “मुलाला सरकारी नोकरी लावून देतो” व “भविष्य उज्ज्वल करतो” असे सांगून त्याने महिलांना फसवले. त्यानंतर नाशिक व इगतपुरी परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तसेच या घटनांचे व्हिडिओ चित्रण केल्याचेही समोर आले आहे.
एरंडे अटकेत; गुन्हा दाखल
महिलेच्या तक्रारीनंतर सातपूर पोलीस ठाण्यात एरंडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.जप्त हार्ड डिस्कमध्ये २००३ ते २०२४ या कालावधीत तयार करण्यात आलेले १२१ हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. संबंधित व्यावसायिक स्वतःला पत्रकार म्हणून सांगत असला तरी तो महिलांना उद्योग सुरू करून देण्यासाठी कन्सल्टंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नाशिकमध्ये पुन्हा उघड झालेल्या या ‘खरात पॅटर्न’मुळे शहरात खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनीही अशा आमिषांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed