वादळी पावसाचा तडाखा; अमळनेर तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान, तात्काळ पंचनाम्याचे आदेश. आमदार अनिल पाटील..
आबिद शेख अमळनेर
अमळनेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, असे आदेश माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या संदर्भात आमदार अनिल पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

चिमनपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बु., अटाळे, शिरसाळे, मारवड, तासखेडा, आमोदे, अंतुर्ली, रंजाणे तसेच बोरी काठावरील आर्डी, अनोरे, जवखेडा यासह नीम, पाडळसरे, कळमसरे, बोहरा, मांडळ, वावडे आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी मका, बाजरी, ज्वारी, गहू आदी पिके आडवी पडली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी काढणीसाठी तयार असलेली मका व गव्हाची पिके कापून ठेवली होती. मात्र, पावसामुळे ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली असून प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
