पाच दिवसांत अनेक अपघात; उंच गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीवितहानी?
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर शहराजवळील दाजीबा नगर समोरील गलवाडे रस्त्यावर नुकत्याच तयार करण्यात आलेल्या उंच गतिरोधकामुळे भीषण अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना पसरली आहे.

गायत्री प्रशांत सूर्यवंशी (वय ४५, रा. मुडी-मांडळ, ता. अमळनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. २८ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्या पती डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह दुचाकीने मुडी येथून अमळनेरकडे जात होत्या. दाजीबा नगर परिसरात समोरील रस्त्यावर नव्याने तयार करण्यात आलेल्या उंच गतिरोधकावर दुचाकी आदळल्याने मागे बसलेल्या गायत्री सूर्यवंशी या खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्यांना तात्काळ अमळनेर येथील नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
मृत गायत्री सूर्यवंशी यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, संबंधित गतिरोधक अत्यंत उंच व निकृष्ट पद्धतीने बांधण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अवघ्या पाच ते सहा दिवसांतच या ठिकाणी तीन ते चार अपघात घडल्याची माहिती समोर आली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर धोकादायक गतिरोधक तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
