सखाराम महाराज रथोत्सव : भजन, कीर्तन व पालखी सोहळ्याने भक्तीचा सोहळा..
अमळनेर : येथील श्री सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे श्री संत सद्गुरु सखाराम महाराजांचा वार्षिक रथोत्सव सन २०२६ मध्ये अत्यंत भक्तिभाव व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शालिवाहन शके १९४८, पराभवनाम संवत्सरानिमित्त आयोजित या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी अनुभवायला मिळणार आहे.
उत्सवाची सुरुवात अक्षयतृतीया, रविवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता स्तंभरोपण व ध्वजारोहणाने होणार आहे. दि. १९ ते २६ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री संत तुकाराम महाराज गाथा भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या भजनात ह.भ.प. शारंगधर महाराज यांच्यासह इतर कीर्तनकार व वारकरी शिक्षण पाठशाळेतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
दि. २६ एप्रिल रोजी ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर यांच्या दिंडीचे आगमन होणार असून रात्री कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार आहे.
दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ९ वाजता श्री संत सद्गुरु सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रमुख दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त भक्तनिवास, वाडी चौक येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १ मे रोजी सकाळी ६ वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भुसावळ रेल्वे बँड तसेच सायंकाळी ५ वाजेपासून श्री सद्गुरु ब्रास बँड, चाळीसगाव यांच्या साथीने पालखी उत्साहात पार पडणार आहे.
उत्सवाची सांगता दि. २ मे रोजी ह.भ.प. मोहित महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली आहे.
या रथोत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
