भटक्या कुत्र्यांना रहिवाशी दाखला व मतदानाचा हक्क द्यावा; पळासदडे ग्रामस्थांचे प्रशासनाला उपरोधिक निवेदन..

0
New-Doc-04-01-2026-21.33-1.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर तालुक्यातील पळासदडे गावात भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला असून ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. ग्रामसभेत तसेच ग्रामसेवक आणि गट विकास अधिकारी (बीडीओ) यांच्या समक्ष हा प्रश्न मांडूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक अनोखा व उपरोधिक मार्ग अवलंबला आहे. गावातील भटक्या कुत्र्यांना पळासदडे गावाचा “रहिवाशी दाखला” द्यावा व आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्यांना “मतदानाचा हक्क” देण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन ग्रामसेवक तसेच गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जर या भटक्या कुत्र्यांवर कोणतीही कारवाई होणार नसेल आणि ते कायम गावातच वावरत असतील, तर त्यांना गावाचे अधिकृत रहिवासी मानण्यास हरकत नसावी. या उपरोधिक मागणीद्वारे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, हा ग्रामस्थांचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, गावात लहान मुले, महिला व वृद्धांना रस्त्यावरून जाणे कठीण झाले असून रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा उपद्रव अधिक वाढत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed