पहाडे कुटुंबाचा देहदानाचा प्रेरणादायी निर्णय; समाजासमोर मानवतेचा नवा आदर्श..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : “अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त ठरतात,” या उदात्त विचाराला कृतीत उतरवत अमळनेर येथील पहाडे कुटुंबाने देहदानाचा समाजाभिमुख निर्णय घेत मानवतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे अमळनेर शहरात अवयवदान व देहदानाबाबत सकारात्मक जनजागृती होत आहे.
लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या वतीने जागतिक अवयवदान दिनानिमित्त वर्षभर जनजागृती मोहीम राबविण्यात येते.

याच पार्श्वभूमीवर संजय कांतीलाल पहाडे व पवन कांतीलाल पहाडे या दोन्ही बंधूंनी लायन्स क्लबचे सदस्य महावीर पहाडे यांच्या माध्यमातून संस्थेशी संपर्क साधला. कांतीलाल पहाडे यांच्या इच्छेनुसार देहदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डॉ. संदीप जोशी व महेंद्र पाटील यांना कळविण्यात आले.
कांतीलाल पहाडे यांचे मंगळवार दि. ३१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता निधन झाले.

त्यांच्या पूर्वसंमतीनुसार व कुटुंबीयांच्या सहकार्याने त्यांचे पार्थिव धुळे येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे सुपूर्द करण्यात आले.
याबाबत माहिती देताना त्यांचे चिरंजीव पवन कांतीलाल पहाडे व संजय कांतीलाल पहाडे म्हणाले, “अवयवांची खरी गरज ही याच भूतलावर असते. गरजू रुग्णांना त्याचा लाभ व्हावा, हीच आमची भावना आहे. वडिलांचे आयुष्य सेवा व त्यागाने समृद्ध होते. त्याच विचारांची परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत.”
विशेष म्हणजे, पहाडे कुटुंबाने यापूर्वीही देहदानाच्या कार्यात पुढाकार घेतला आहे. महावीर पहाडे यांनी आपल्या मातोश्री कै. कांताबाई पहाडे यांचेही देहदान करून समाजासमोर आदर्श ठेवला होता. त्यामुळे या कुटुंबाचे समाजाभिमुख कार्य अधिक ठळकपणे समोर आले आहे.
या निर्णयामुळे अमळनेर शहरात अवयवदानाबाबत जनजागृतीला चालना मिळाली असून अनेक नागरिकांनीही पुढाकार घेत अवयवदानाची प्रतिज्ञा करण्यास सुरुवात केली आहे. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या उपक्रमाबाबत माहिती देताना लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, प्रोजेक्ट चेअरमन महावीर पहाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अधिकाधिक नागरिकांनी अवयवदान व देहदानासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी योगेश मुंदडा, प्रशांत सिंघवी, नीरज अग्रवाल, प्रदीप जैन, मनीष जोशी, विनोद अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, पंकज मुंदडा, डॉ. संदेश गुजराती, प्रसन्न शहा, प्रकाश शहा, डॉ. रवींद्र जैन यांच्यासह अनेक लायन्स क्लब सदस्य उपस्थित होते.
: देहदानामुळे वैद्यकीय शिक्षणाला चालना
देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास करता येतो. तसेच वैद्यकीय संशोधनासाठीही यामुळे मोठी मदत होते. त्यामुळे देहदान हे केवळ सामाजिक कार्य नसून वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान मानले जाते.
