शिरूड विकास सहकारी सोसायटीचा सलग ३० व्या वर्षी १०० टक्के कर्जफेडीचा विक्रम..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – अमळनेर तालुक्यातील शिरूड गावातील शिरूड विकास सहकारी सोसायटीने सलग ३० व्या वर्षी ३१ मार्च रोजी १०० टक्के कर्जफेड करून एक आदर्श परंपरा कायम ठेवली आहे.

सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना २ कोटी ९५ लाख ३३ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. हे संपूर्ण कर्ज शेतकऱ्यांनी ३१ मार्च रोजी वेळेत भरल्यामुळे जिल्हा बँकेचे कर्ज पूर्णपणे फेडले गेले असून उर्वरित रक्कम सोसायटीच्या करंट खात्यात जमा झाली आहे.

शिरूड विकास सहकारी सोसायटीची गावात प्रशस्त व भव्य अशी सागवान लाकडाची इमारत आहे. या इमारतीतच जिल्हा बँकेची शाखा कार्यरत असून सोसायटीमार्फत गावात स्वस्त धान्य दुकान तसेच दुकान संकुल देखील चालविले जाते. त्यामुळे सोसायटीने आर्थिक प्रगतीसोबतच गावाच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलला आहे.
सोसायटीच्या सातत्यपूर्ण प्रगतीमध्ये गावातील सर्व शेतकरी बांधवांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सन २०२५–२६ मध्ये १०० टक्के कर्जफेड होण्यासाठी चेअरमन अरुण दादा पाटील, व्हॉईस चेअरमन सविता ताई, संचालक प्रा. सुभाष पाटील, बापूराव महाजन, गोरख धनगर, धोंडू मास्तर, अनंतराव मोरे, सुभाष महाजन, सीताराम पाटील, भास्कर पाटील, वासुदेव पाटील, तिलोत्तमा ताई, शाम बापू, मीराताई पाटील तसेच सेक्रेटरी रविंद्र आप्पा, सेल्समन वीरभान जीभू, बापू मोरे यांचे विशेष योगदान लाभले.
याशिवाय बँकेचे व्यवस्थापक शेषराव साहेब, सोनवणे साहेब, आहिराव साहेब, भाऊसाहेब पाटील, प्रफुल पाटील, सुपडू पाटील, वसंत पाटील, नंदू पाटील यांच्यासह सर्व संबंधितांनी दिलेल्या सहकार्यामुळे सोसायटीने सलग ३० व्या वर्षी १०० टक्के कर्जफेडीचा मानाचा विक्रम कायम ठेवला आहे. या यशाबद्दल गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
