मार्चपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजनेचा फेब्रुवारी हप्ता खात्यात; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती..
24 प्राईम न्यूज 28 मार्च 2026
राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांसाठी दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया शुक्रवारी सुरू करण्यात आली आहे.

पुढील २ ते ३ दिवसांत म्हणजेच ३१ मार्चपूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी जमा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यभरातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा निधी एकत्र दिला जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र सरकारने सध्या फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती आदिती तटकरे यांनी ‘एक्स’ (सोशल मीडियावर) पोस्टद्वारे दिली.

महायुती सरकारच्या वतीने ही योजना सातत्याने सुरू राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे ही योजना अधिक वेगाने राबवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील लाडक्या बहिणींचा विश्वास आणि सरकारचा ठाम निर्धार यामुळे ही योजना पुढील काळातही अशीच दमदारपणे सुरू राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
