आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधन टंचाईबाबत अफवा; प्रशासनाचा इशारा, पंपधारकांना कडक मार्गदर्शक सूचना..

0
New-Doc-03-28-2026-06.55.jpg


आबिद शेख/ अमळनेर
सध्या उद्भवलेल्या Gulf War च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व पेट्रोल पंपधारकांना तसेच नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून इंधन पुरवठा नियमित सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील Bharat Petroleum Corporation Limited (BPCL), Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL), Indian Oil Corporation Limited (IOCL), Nayara Energy तसेच Reliance Petroleum यांच्या सर्व पेट्रोल व डिझेल पंपांना पेट्रोलियम अधिनियम 1934 व जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
पंपधारकांसाठी प्रशासनाच्या सूचना
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असून तांत्रिक कारणाशिवाय किंवा साठा संपल्याशिवाय ‘नो स्टॉक’चा फलक लावू नये. पेट्रोल व डिझेल विक्री करताना नागरिकांना बाटली, कॅन किंवा इतर भांड्यांमध्ये इंधन देऊ नये. साठेबाजी करणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


तसेच पंपधारकांनी जाणीवपूर्वक साठा करून ठेवू नये. साठा असूनही विक्री नाकारल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पंपावर गर्दी झाल्यास वाहनांच्या रांगा शिस्तबद्ध ठेवण्याच्या तसेच अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊन टाक्या फुल करून घेणे किंवा घरामध्ये डब्यांमध्ये पेट्रोल-डिझेल साठवणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अनधिकृत साठवणूक ही कायद्यानुसार गुन्हा असून ती अत्यंत धोकादायक ठरू शकते, असेही सांगण्यात आले आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये व खातरजमा न करता ते पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर सायबर कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
साठ्याची तपासणी सुरू
जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व पेट्रोल पंपांच्या साठ्याची तपासणी सुरू असून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंपधारकांवर परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed