अम्लेश्वर नगरमध्ये गावठी कट्टा हाताळताना गोळी लागून तरुणाचा मृत्यू..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : येथील अम्लेश्वर नगर भागात अरुण सुरेश महाजन या तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण गावठी कट्टा हाताळत असताना अचानक गोळी सुटून त्याच्या अंगाला लागली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरू केला आहे. नेमकी घटना कशी घडली, कट्टा कुठून आला आणि हा अपघात आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे अम्लेश्वर नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
