प्रताप नगर परिसरातील गटार समस्येला अखेर तोडगा; प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईने नागरिकांना दिलासा…
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – शहरातील प्रताप नगर, गलवाडे रोड येथील गोकुळधाम सोसायटी परिसरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली गटारीची समस्या अखेर निकाली निघाली असून स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या परिसरात रस्त्यावर मोठा खड्डा पडून त्यात सतत पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना रोजच अडचणींचा सामना करावा लागत होता. साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांकडून पाणी उडून नागरिकांना मनस्ताप होत होता तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता.

या गंभीर समस्येकडे “दै. नवभारत हिंदी नेशनल”चे पत्रकार नूरखान यांनी वेळोवेळी लक्ष वेधले होते. सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले. अखेर प्रशासनाने याची दखल घेत तातडीने उपाययोजना सुरू केली.
अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीरता ओळखून बांधकाम विभागाला तात्काळ आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार संबंधित विभागाने जलद गतीने काम हाती घेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने भुयारी गटाराचे काम पूर्ण केले.

सदर काम पूर्ण झाल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या आता कायमची दूर झाली आहे. रस्त्यावर पाणी साचणे थांबल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून येण्या-जाण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच “नवभारत”च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचेही नागरिकांनी कौतुक केले आहे. या कामामुळे परिसरातील स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
