सुट्टीच्या दिवशीही कर भरण्याची सुविधा; नागरिकांसाठी नगरपरिषद अमळनेरचा उपक्रम..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषद अमळनेरतर्फे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, आता मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचा भरणा सुट्टीच्या दिवशीही करता येणार आहे.

या निर्णयामुळे कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कर भरणा करता न येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नगरपरिषदेच्या वसुली विभागाकडून सुट्टीच्या दिवशीदेखील वसुली केंद्र सुरू ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपले मालमत्ता कर व पाणीपट्टी वेळेत भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कर वेळेत भरल्यास अनावश्यक दंड, कटुता व अडचणी टाळता येतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच, “कर भरा – कटुता टाळा” या संदेशासह नागरिकांनी सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी आणि शहराच्या नागरी सुविधांच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद अमळनेरचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे कर वसुलीला गती मिळण्यास मदत होणार असून, शहराच्या विकासकामांसाठीही निधी उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.

