दाजीबा नगर महिला आंदोलनाला यश; आमदार अनिल पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर स्पीड ब्रेकरच्या कामास सुरुवात..

0
New-Doc-03-27-2026-06.48.jpg


अपघातग्रस्त परिसरातील नागरिकांना दिलासा; महिलांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम
अमळनेर | आबिद शेख
अमळनेर शहरातील दाजीबा नगर – गळवाडे रोड परिसरात वारंवार होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक महिलांनी उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे २६ मार्च २०२६ रोजी स्पीड ब्रेकरच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे काम आमदारांनी स्वखर्चातून करून देत असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दाजीबा नगर – गळवाडे रोड परिसरात एका महिलेचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक महिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धरणे आंदोलन करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते; मात्र कामाला विलंब होत असल्याने महिलांनी थेट आमदार अनिल पाटील यांची भेट घेतली.


महिलांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदारांनी आठ दिवसांच्या आत स्पीड ब्रेकर उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज आर.बी. कन्स्ट्रक्शन मार्फत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करत आमदारांच्या तत्परतेचे कौतुक केले.
काम सुरू असताना काही राजकीय कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र स्थानिक महिलांनी हा प्रश्न नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित असून त्यावर राजकारण करू नये, तसेच फुकटचे श्रेय घेऊ नये, अशी भूमिका स्पष्टपणे मांडली. महिलांमध्ये व काही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला; मात्र परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी संबंधितांनी तेथून माघार घेतली.
या संपूर्ण प्रक्रियेत महिलांनी एकजुटीने लढा दिला असून त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या वेळी सौ. नूतन पाटील, आशा नामदेव पाटील, निर्मला अरविंद पाटील, संगीता कापडणे, सुरेखा पाटील, सरला पाटील, नेहा परदेशी, तृप्ती डहाके, वैशाली पाटील, योजना पाटील, ज्योती पवार, रेखा चंद्रकांत पाटील, रेखा भागवत, मानसी पाटील, बबिता झिमबल, पुरुषोत्तम पाटील, अशोक पाटील, सुमेरसिंह पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांनी आता या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त स्पीड ब्रेकर, इशारा फलक आणि प्रकाशव्यवस्था उभारण्याची मागणीही प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed