वडिलांची अपूर्ण इच्छा… मुलाने ४५ महिलांना सप्तशृंगी देवीचे दर्शन घडवून पूर्ण केली श्रद्धांजली..

0
New-Doc-03-25-2026-23.32.jpg

आबिद शेख अमळनेर
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील एका शिक्षक-पत्रकाराने आपल्या वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा अनोख्या पद्धतीने पूर्ण करत गावात आदर्श निर्माण केला आहे. वडिलांना स्वतः गडावर नेऊ न शकल्याची खंत मनात ठेवून त्यांनी गावातील ४५ महिलांना स्वखर्चाने सप्तशृंगी गड मंदिर येथे नेऊन देवीचे दर्शन घडवले.


अमळनेर तालुक्यातील गंगापुरी येथील भीमराव किसन रामोसे (वय ७९) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे ते दीर्घकाळ अंथरुणाला खिळले होते. मृत्यूशी झुंज देत असताना त्यांनी आपला मुलगा पत्रकार तसेच शिक्षक महेंद्र रामोसे यांच्याजवळ शेवटची इच्छा व्यक्त केली – “मला सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घ्यायचे आहे.”


वडिलांची इच्छा ऐकून महेंद्र रामोसे यांच्या डोळ्यात अश्रू आले. शाळेच्या कामातून वेळ काढून सुट्टीच्या दिवशी वडिलांना गडावर घेऊन जाऊ, असा त्यांनी निर्धार केला. मात्र त्यापूर्वीच भीमराव रामोसे यांचे निधन झाले आणि वडिलांची इच्छा अपूर्णच राहिली.


ही खंत मनात ठेवून महेंद्र रामोसे यांनी सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर एक वेगळाच निर्णय घेतला. “वडिलांना गडावर नेऊ शकलो नाही, पण त्यांच्या नावाने इतरांना देवीचे दर्शन घडवू,” असा निर्धार करून त्यांनी आपल्या आईसोबत गावातील ४५ महिलांना स्वखर्चाने सप्तशृंगी गड मंदिर येथे नेऊन देवीचे दर्शन घडवले.
महेंद्र रामोसे यांच्या या कार्याचे गावात मोठे कौतुक होत असून, श्रद्धा आणि भक्ती कोणत्याही मार्गाने व्यक्त करता येते, याचा हा सुंदर आदर्श असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed