सुरक्षा कठडा तुटला, रस्ता फुटला; देवली – सिंधी कैम्प मारगावर प्रवाशांचे हाल.

0

अमळनेर/ आबिद शेख 

अमळनेर शहरातील देवली फाटा ते सिंधी कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि तुटलेला सुरक्षा कठडा यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः अंबाऋषी टेकडीखालील रस्त्याची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे.

या मार्गावरून शहरासह परिसरातील गावांतील नागरिक, दुचाकी व चारचाकी वाहनांची दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्डे, उखडलेले डांबर यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी व चिखल साचत असून, अंदाज न आल्याने वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

*तुटलेला सुरक्षा कठडा ठरतोय धोकादायक*
या रस्त्याच्या कडेला वाहनांच्या सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेला लोखंडी सुरक्षा कठडा (क्रॅश बॅरिअर) अनेक ठिकाणी तुटलेला आहे. रात्रीच्या वेळी हा तुटलेला कठडा अधिक धोकादायक ठरू शकतो. वाहनाचा तोल गेल्यास संरक्षण मिळणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

खराब रस्त्यामुळे वाहनांच्या टायर, चाकांचे नुकसान होत असून, दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना अचानक वळण घ्यावे लागत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांशी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

देवली फाटा ते सिंधी कॅम्प या मार्गावर खराब रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च होत असून, सकाळ-संध्याकाळ वाहतूक विस्कळीत होत आहे.

तातडीने दुरुस्तीची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे, डांबरीकरण करणे आणि तुटलेल्या सुरक्षा कठड्यांची दुरुस्ती करून नव्याने कठडे बसवावेत. केवळ तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed