भाडे थकबाकीपोटी चार शाळांवर पालिकेची सील कारवाई..
अमळनेर । आबिद शेख
मार्चअखेर वसुलीचा तगादा लावत अमळनेर नगरपालिकेने थकबाकीदारांवर कडक कारवाई सुरू केली असून भाडे थकबाकीपोटी चार शाळांच्या प्रवेशद्वारावर सील लावण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नगरपालिकेकडून सुट्यांच्या दिवशीसुद्धा कर वसुली मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

नागरिकांनी सुमारे ४० लाख रुपयांची थकबाकी तात्काळ भरावी, अन्यथा जप्ती, सील लावणे, कुलूप लावणे यांसारख्या कठोर कारवाया करण्यात येतील, असा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे.

२२ मार्च रोजी मिळकत व्यवस्थापक लौकिक समशेर, वरिष्ठ लिपिक विजय बागुल, राजू वानखेडे आणि मनोज सोनार यांच्या पथकाने खालील शाळांवर कारवाई केली –
मुंदडा इंग्लिश मिडीयम स्कूल
छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर तांबेपुरा
न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल
अनिल अंबर उर्दू शाळा क्रमांक ११
या सर्व शाळांच्या प्रवेशद्वारावर सील लावून पालिकेने थकबाकीदारांना कडक संदेश दिला आहे.
दरम्यान, पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापणे तसेच मालमत्ता कर व भाडे थकबाकी असलेल्या मालमत्ता सील करण्याची कारवाईही सुरू असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मार्चअखेरपर्यंत वसुलीचा वेग वाढवून थकबाकी पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
नागरिकांनी त्वरित थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.
