अमळनेरात २२ ते २५ मार्चदरम्यान ‘मतदार मॅपिंग’ मोहीम; बीएलओंना पूर्णवेळ कामाचे आदेश..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर येथे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. २२ ते २५ मार्च या कालावधीत तालुक्यातील सर्व बीएलओ (BLO) यांना नियमित कामकाजातून कार्यमुक्त करून पूर्णवेळ ‘मतदार मॅपिंग’चे काम करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

विशेष सखोल पुनःरीक्षण (SIR) कार्यक्रम १ एप्रिलपासून सुरू होणार असून, त्याआधी मतदार यादीतील त्रुटी दूर करून अद्ययावत माहिती संकलित करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदार मॅपिंगचे सर्व काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

या चार दिवसांच्या कालावधीत बीएलओ घराघरात जाऊन मतदारांची माहिती तपासणार आहेत. नव्या मतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची वगळणी तसेच नाव, पत्ता आणि इतर माहितीतील आवश्यक दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार असल्याचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी सांगितले. प्रशासनाच्या या मोहिमेमुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारी अधिक भक्कम होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

