महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात प्रकरणात राज्य हादरलं! महाराष्ट्र राज्य महिला आयोग आक्रमक; SIT चौकशीसाठी सरकारला थेट इशारा..
नाशिक/प्रतिनिधी
नाशिक : महिलांची फसवणूक करून अंधश्रद्धेच्या आडून लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी स्वतःहून (Suo Motu) दखल घेत राज्य शासनाला कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नाशिक येथे उघडकीस आलेल्या या प्रकरणात आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व इतर साहित्यामध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. यावरून अनेक महिलांची संघटित पद्धतीने फसवणूक व शोषण करण्यात आले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महिला आयोगाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, हा केवळ एक गुन्हा नसून महिलांच्या सन्मानावर झालेला घृणास्पद आणि अमानुष हल्ला आहे. अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
आयोगाच्या आक्रमक मागण्या
महिला आयोगाने राज्य सरकारला पाठवलेल्या निवेदनात खालील महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत :
वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी
भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कलमे लावण्याचे आदेश
जप्त करण्यात आलेल्या ५८ व्हिडिओंचे तातडीने फॉरेन्सिक विश्लेषण
पीडित महिलांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून पोलीस संरक्षण देण्याची मागणी
राज्यभरात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा गुन्हेगारी जाळ्यांवर विशेष मोहीम
पीडित महिलांसाठी समुपदेशन, कायदेशीर मदत व पुनर्वसन
“राजकीय दबाव नको, थेट कठोर कारवाई करा!”
महिला आयोगाने स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला आहे की या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा सामाजिक दबाव येऊ नये. तपास पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावा, अन्यथा महिलांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास ढासळेल, असे आयोगाने नमूद केले आहे.
राज्यातील महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांविरुद्ध आता कडक कारवाई झाली नाही तर समाज कधीच माफ करणार नाही, असा संतप्त सूरही आयोगाने व्यक्त केला आहे.
