अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्याने शेती पिकांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनाम्याची मागणी…

अमळनेर /आबिद शेख
दि. २० मार्च २०२६ रोजी पहाटे १.०० ते ४.०० वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यात जोरदार वादळी वारा वाहिल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

वादळी वाऱ्यामुळे मका, गहू, दादर, बाजरी, ज्वारी, हरभरा तसेच कांदा, टोमॅटो आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः तालुक्यातील पूर्वेकडील भागातील पातोंडा, नांद्री, खवशी, पिंपळी, दहिवद, मठगव्हाण या गावांमध्ये मका, दादर, ज्वारी आणि बाजरीची पिके पूर्णपणे आडवी पडली आहेत. या पिके पुन्हा उभी राहण्याची शक्यता नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
सध्या गहू कापणीस आलेला असल्याने तो पांढरा (पोट्या) पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच हरभरा पक्व झालेला असल्याने त्याचे घाटे जमिनीवर गळून पडले आहेत.

एकूणच शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे सुमारे ७५ टक्के नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत तसेच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
