प्रभाग क्रमांक १७ मध्ये अतिवृष्टीग्रस्त मालमत्तांचे पंचनामे सुरू; नागरिकांना सहकार्याचे आवाहन.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर नगरपरिषदेमार्फत ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तांचे पंचनामे करण्याचे काम आजपासून प्रभाग क्रमांक १७ मध्ये सुरू करण्यात आले आहे. यासाठी नगरपरिषदेच्या संबंधित विभागातील नियुक्त कर्मचारी नागरिकांच्या परिसरात भेट देऊन नुकसानीची नोंद करणार आहेत.

अतिवृष्टीमुळे ज्यांच्या घर, दुकान, धान्य, कपडे किंवा इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे, अशा नागरिकांनी पंचनामा करताना कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंचनाम्यासाठी कुटुंब प्रमुखाचे आधारकार्डाची झेरॉक्स, बँक पासबुकाची झेरॉक्स तसेच नुकसानीसंदर्भातील आवश्यक माहिती व कागदपत्रे तयार ठेवावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे. अचूक पंचनामा होऊन शासनाकडे त्वरित अहवाल सादर झाल्यास पात्र नागरिकांना शासकीय मदत मिळण्यास विलंब होणार नाही.
पंचनाम्यादरम्यान कोणतीही अडचण अथवा समस्या उद्भवल्यास प्रभागाच्या नगरसेविका सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांच्याशी मो. ९५७९६२३९२३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
