केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते ‘प्रताप संवाद’ शैक्षणिक मासिकाचे भव्य विमोचन..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर या नामवंत शैक्षणिक संस्थेच्या ‘प्रताप संवाद’ या शैक्षणिक मासिकाचे विमोचन आज देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार तथा मंत्री रक्षाताई खडसे, जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अक्षय कृषी परिवारचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमात खान्देश शिक्षण मंडळ चे अध्यक्ष विनोद अग्रवाल, कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, ज्येष्ठ संचालक योगेश मुंदडे तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘प्रताप संवाद’ पत्रिकेची वैशिष्ट्ये

त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.
या शैक्षणिक मासिकाचा मुख्य उद्देश विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्था यांच्यात प्रभावी सुसंवाद प्रस्थापित करणे हा आहे. “संकल्प एक, ध्येय अनेक, सुसंवादासाठीच हे लेख” या ब्रीदवाक्यावर आधारित असलेली ही पत्रिका पूर्णपणे डिजिटल स्वरूपात सुरू करण्यात आली आहे.
संस्थेमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचे यश, शैक्षणिक घडामोडी आणि उपयुक्त माहिती विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ई-मासिक सुरू करण्यात आले आहे. ही पत्रिका सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच या शैक्षणिक मासिकात कोणत्याही प्रकारची राजकीय बातमी प्रकाशित केली जाणार नसल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.
संस्थेचे कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल यांनी यावेळी बोलताना, या सुसंवादातून विद्यार्थ्यांच्या करिअरला आणि आयुष्याला योग्य दिशा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाशनामुळे खान्देश शिक्षण मंडळाच्या या नव्या उपक्रमाला मोठी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
