अमळनेरमध्ये गांजा सेवन करणाऱ्या चार तरुणांना पोलिसांचा दणका; संयुक्त कारवाईत रंगेहात पकडले.

0
New-Doc-03-13-2026-09.38.jpg

आबिद शेख अमळनेर
अमळनेर : शहरात येणाऱ्या गांजावर मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात आला असला तरी काही तरुण गांजा सेवन करून व्यसनाधीन होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (एलसीबी) आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शहरातील विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत गांजा सेवन करत असलेल्या चार तरुणांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही तरुण गांजा सेवनाकडे वळत असल्याने भविष्यात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे ११ मार्च रोजी विविध पथके तयार करून शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले.
मारवड रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली राजेश चुडामन कोईकर (वय २१, रा. बंगाली फाईल) हा चिलीममध्ये गांजा भरून सेवन करताना आढळून आला. तसेच इंदिरा भवनच्या मागील मोकळ्या जागेत आदिल आबीद शेख (वय २५, रा. माळीवाडा, बहादरपूर रोड) याला गांजा सेवन करताना पकडण्यात आले.
तिसऱ्या कारवाईत रेल्वे स्टेशनबाहेरील पाण्याच्या टाकीजवळ निलेश महेंद्र पाटील (वय २२, रा. बंगाली फाईल) हा चिलीममध्ये गांजा सेवन करताना आढळून आला. तर इंदिरा भवनच्या मागील भागात नईमअली अशपाक अली (वय २५, रा. गांधलीपुरा) हा देखील गांजा सेवन करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
चारही तरुणांकडून चिलीम व गांजा जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे गांजा सेवन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, शेतकी संघ जीन परिसर, बसस्थानकाच्या मागील भाग, अंबाऋषी टेकडी, चोपडा रोड उड्डाणपूल, तसेच दाजीबा नगरजवळील मैदान या ठिकाणीही काही तरुण गांजा सेवन करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असून त्या ठिकाणीही कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ही कारवाई एलसीबी निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण मांडोळे, संदीप पाटील तसेच अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, नितीन मनोरे, उदय बोरसे, निलेश मोरे, उज्वल कुमार म्हस्के आणि नितीन कापडणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed