जीवन कला संस्कार केंद्र व पारनेरकर गुरु सेवा मंडळातर्फे अमळनेर भुषण व सेवाव्रती पुरस्कारांचा गौरव..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : जीवन कला संस्कार केंद्र अमळनेर व श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५–२६ या वर्षातील ‘अमळनेर भुषण पुरस्कार’ श्री. ओमप्रकाशजी मुंदडा यांना तर ‘घ.भी. धांडे सेवाव्रती पुरस्कार’ डॉ. अविनाशजी जोशी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. गुणेशजी पारनेरकर होते. यावेळी पुरस्कारप्राप्त श्री. ओमप्रकाश मुंदडा व डॉ. अविनाश जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करून मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

प्रमुख अतिथी डॉ. भरत अमळकर यांनी केशव स्मृती समूहाच्या सामाजिक कार्याचा परिचय करून देत उपस्थितांशी संवाद साधला. अध्यक्षीय भाषणात श्री. गुणेशजी पारनेरकर यांनी प्रबोधन करताना व्यक्तीच्या उन्नतीतूनच समाजाची उन्नती साध्य होते, असे प्रतिपादन केले. त्यांनी संस्कार व संस्कृती यातील फरक स्पष्ट करताना सांगितले की, संस्कार हे व्यक्तीवर घडतात, तर संस्कृतीचे दर्शन समाजातून घडते. केवळ सामाजिक विकास हे ध्येय न ठेवता व्यक्ती, व्यक्तित्व व व्यक्तिमत्व घडवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगेशजी पाटील यांच्या मधुर बासरी वादनाने वातावरण प्रसन्न झाले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. पपीता जोशी यांनी केले. यावेळी जीवन कला संस्कार केंद्राचे अध्यक्ष डॉ. अशोक रावेरकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमात विविध मान्यवर व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अमळनेर, सावदा, जळगाव व धुळे येथील शिष्यवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेर व परिसरातील मान्यवर तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

