प्रामाणिकपणाचे उदाहरण : एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशाची हरवलेली बॅग सुरक्षित परत केली..

0
New-Doc-03-11-2026-22.23.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा आणि तत्पर सेवा पुन्हा एकदा समोर आली आहे. अमळनेर ते धुळे मार्गावरील बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाची हरवलेली बॅग एसटी कर्मचाऱ्यांनी शोधून सुरक्षितपणे परत केल्याची घटना बुधवारी (११ मार्च) घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, शिवम् मानकर (रा. धुळे, मूळ अमरावती) हे अमळनेर ते धुळे या एसटी बसने प्रवास करत होते. सायंकाळी सुमारे ४:४५ वाजता धुळे येथे उतरताना घाईगडबडीत ते आपली बॅग बसमध्येच विसरून उतरले. त्या बॅगेमध्ये सुमारे २५०० रुपये रोख रक्कम तसेच अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे होती.


दरम्यान, संबंधित बस धुळे येथून पुढे धुळे ते जळगाव मार्गाने रवाना झाली होती. प्रवासी शिवम् मानकर हे धुळे येथील वाहतूक नियंत्रक कक्षात चौकशीसाठी गेले असता, तेथे उपस्थित धुळे आगाराचे चालक महेंद्र सनेर यांनी त्यांची विचारपूस करून तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला.
महेंद्र सनेर यांनी अमळनेर आगाराचे वाहक नितिन बागले यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नितिन बागले यांनी संबंधित बसचे वाहक बापू चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, प्रवाशाने सांगितलेल्या वर्णनानुसार ती बॅग बसमध्ये सापडली. बापू चौधरी यांनी बॅगमधील रोख रक्कम व सर्व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवली.
यानंतर शिवम् मानकर यांनी आपल्या घराजवळील मित्राला माहिती दिली. त्या मित्राने पारोळा बस स्थानकावर जाऊन सदर बॅग रोख रक्कम व सर्व कागदपत्रांसह ताब्यात घेतली.
या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, जबाबदारीची भावना आणि तत्पर सेवा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. चालक महेंद्र सनेर, वाहक नितिन बागले आणि बापू चौधरी यांनी दाखवलेली प्रामाणिकता निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed