“ताडेपुरा-पैलाडचा अपमान सहन नाही!” – अमळनेर पालिकेवर ढोल बजावो आंदोलन; नमो गार्डन ताडेपुऱ्यातच होणार…

0
New-Doc-03-11-2026-22.06.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – ताडेपुरा तलाव परिसराविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ ताडेपुरा व पैलाड परिसरातील नागरिकांनी अमळनेर नगरपरिषदेसमोर जोरदार ‘ढोल बजावो’ आंदोलन करत संताप व्यक्त केला.

या आंदोलनामुळे पालिकेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांचा रोष पाहून उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व नगराध्यक्षांनी मोर्चाला सामोरे जाणे टाळल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला.


शहरात १ कोटी रुपयांच्या निधीतून नमो गार्डन उभारण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी ताडेपुरा परिसर हा नाल्याचा भाग असून येथे दुर्गंधी येते, असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. या वक्तव्यामुळे ताडेपुरा व पैलाड परिसरातील नागरिकांनी पालिकेकडे मोर्चा काढून ढोल वाजवत जोरदार आंदोलन केले. “जोपर्यंत उपनगराध्यक्ष जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली होती.
दरम्यान, आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून ताडेपुरा तलावाच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याच परिसरात १ कोटी रुपयांचे नमो गार्डन उभारण्याची मागणी शहर विकास आघाडीने केली होती. मात्र सत्ताधारी गटाने हे उद्यान शहराच्या मध्यवर्ती भागात करावे अशी सूचना मांडल्याने दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. याच वादातून उपनगराध्यक्ष निकम यांनी ताडेपुरा तलावात गटारीचे पाणी साचते, असे वक्तव्य केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
आंदोलनावेळी सत्ताधारी गटातील नगरसेवक साहेबराव पवार व अनिल महाजन यांनी आंदोलकांशी चर्चा करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या वक्तव्याबद्दल माफी मागत आंदोलन मागे घेण्याची विनंतीही केली. मात्र आंदोलकांनी “ज्यांनी वक्तव्य केले त्यांनीच माफी मागावी” अशी भूमिका कायम ठेवली. त्यानंतर आंदोलकांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात शहराच्या विकासाच्या योजना स्वागतार्ह असल्या तरी त्यासाठी काही भागांना कमी लेखणे, नागरिकांचा अपमान करणे आणि ताडेपुरा तलावाला गटारीचे पाणी साचलेला भाग म्हणून हिणवणे ही भूमिका चुकीची असल्याचे नमूद करण्यात आले. जर तलावात गटारीचे पाणी साचत असेल तर त्याचे शुद्धीकरण व व्यवस्थापन करणे ही नगरपरिषदेची जबाबदारी नाही काय, असा सवालही करण्यात आला.
मोर्चात नगरसेविका शोभाबाई भिवसन गढरे, नगरसेवक राजू फाफोरेकर, माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील, दुर्गेश रवींद्र पाटील, अमर बालू पाटील, विशाल नारायण धनगर, हितेश अनिल पाटील, राकेश सुरेश पाटील, रोशन मुरलीधर पाटील, दिनेश आनंद कुंभार, दीपक ज्ञानेश्वर पाटील, निरज ज्ञानेश्वर पाटील, ललित कैलास पाटील, जयेश वाल्मिक पाटील, हर्षल पंडित पाटील, सतीश पुनमचंद पाटील, चेतन भरत पवार, चेतन रविंद्र पाटील, राज संजय कुंभार, राहुल रमेश गुरव, भूषण राजेंद्र लोहार, सूरज अभांगे, हेमंत देसले, भूषण दत्तू पाटील, अविनाश बोरसे, मुकेश प्रकाश पाटील, चतुर पाटील, गुलाब आधार पाटील, राहुल विजय पाटील, विशाल भरत पाटील यांच्यासह ताडेपुरा परिसरातील शेकडो महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नमो गार्डन ताडेपुऱ्यातच होणार. – मुख्याधिकार
आंदोलनानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. ताडेपुरा तलावाचे ५ कोटी रुपयांचे सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगत नमो गार्डनसाठी आवश्यक जागा देखील ताडेपुरा तलाव परिसरात असल्याने नमो गार्डन याच ठिकाणी विकसित केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed