“नळातून पाणी की गटार? पिंपळे रोड परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी; दोन दिवसांत तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा”

0
New-Doc-03-11-2026-10.12.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर शहरातील पिंपळे रोड परिसरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्व्हची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नळातून गटारीचे पाणी मिसळून दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी केली आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नळातून येणाऱ्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात नगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


दरम्यान, पिंपळे रोड परिसरातील नाल्याची साफसफाई करूनही त्यातील कचरा मागील आठ दिवसांपासून उचलण्यात आलेला नाही. आरोग्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कचरा उचलला जात नसल्याचा आरोप नगरसेवक सचिन पाटील यांनी केला आहे.
नगराध्यक्ष स्वतः डॉक्टर असतानाही शहरातील नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली. “नगराध्यक्ष केवळ रबरी शिक्का ठरले असून त्यांचे रिमोट कंट्रोल नंदुरबारमधून चालते. तेथून जसे आदेश येतील तसेच काम केले जाते,” असा आरोपही त्यांनी केला.
तसेच, “दोन दिवसांच्या आत पिंपळे रोड परिसरातील नाल्यातील कचरा उचलून पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आगळे-वेगळे आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा नगरसेवक सचिन बळवंत पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed