व्हिडिओ क्लिप सांगून ब्लॅकमेलिंगचे धंदे नंदुरबारलाच दाखवा; आमच्या आमदारांवर कोणताही डाग नाही..

0
New-Doc-03-10-2026-23.58.jpg

आबिद शेख/अमळनेर
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील व शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांचा माजी आमदारांवर पलटवार
अमळनेर (प्रतिनिधी) : आमदार अनिल पाटील यांच्याविषयी व्हिडिओ क्लिप असल्याचे सांगून ब्लॅकमेलिंग करण्याचे धंदे नंदुरबारलाच दाखवा.

आमच्या आमदारांवर कोणताही डाग नसून ते स्वच्छ प्रतिमेचे व विकासाभिमुख नेते आहेत, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील व शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी माजी आमदारांवर केला आहे.
माजी आमदारांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रक काढत विविध मुद्द्यांवर खुलासा केला. त्यात म्हटले आहे की, माजी आमदारांनी स्वकल्पित व्हिडिओ क्लिप तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिल्याचे सांगितले. जर तसे असेल तर त्यावर कोणतीही कारवाई का झाली नाही आणि त्यानंतर मंत्रीपद कसे देण्यात आले, याचा खुलासा त्यांनी करावा.


तसेच, जर अशी व्हिडिओ क्लिप खरोखरच त्यांच्या जवळ असती, तर ती जनतेसमोर आणली असती. त्यामुळे अशा आरोपांवर जनता विश्वास ठेवणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. नंदुरबार येथे झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओबाबतही त्यांनी प्रतिक्रिया देत, तो व्हिडिओ आम्ही तयार केलेला नसून नंदुरबारमधील नागरिकांनीच तो सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. जे घडले तेच व्हिडिओमध्ये दिसत असताना त्यावर राग व्यक्त करण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला.
डीपी रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करावी. तसेच माजी आमदारांच्या कार्यकाळात झालेल्या रस्त्यांच्या कामांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आमदार कोणत्या रस्त्याच्या कामात भागीदार आहेत, हे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. उलट त्यांच्या काळात कोणकोणाला कामे देण्यात आली याची संपूर्ण यादी आमच्याकडेही असल्याचे त्यांनी सांगितले.
पीक विम्याच्या पैशांबाबत केलेला आरोपही त्यांनी फेटाळून लावत, मदत व पुनर्वसन विभागामार्फत डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ६९२ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे आमदारांवर असे आरोप करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच माजी आमदारांनी विद्यमान आमदारांविषयी ‘तू-ता’ अशी भाषा वापरून असंसदीय वक्तव्य केल्याची टीकाही त्यांनी केली. अमळनेरची संस्कृती अशी नाही, असेही त्यांनी नमूद केले. आमदार अनिल पाटील हे या मतदारसंघाचे भूमिपुत्र असून गाव सोडावे लागेल अशा धमक्या देणे योग्य नाही. उलट परिस्थिती बदलल्यास तुम्हालाच गाव सोडावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
पालिकेत मिळालेल्या सत्तेचा काही दिवस आनंद घ्या, मात्र अमळनेर शहर व मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार अनिल पाटील सक्षम असून विकासाची गती कायम ठेवतील, असा दावा भागवत पाटील व मुक्तार खाटीक यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed