“पीएफचा हिशोब द्या, नाहीतर बिल रोखा!” – अमळनेर नगरपरिषदेत घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी नगरसेवक नाविद शेख…

0
New-Doc-03-10-2026-23.40.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर नगरपरिषदेत घंटागाडी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) रकमेबाबत मोठा वाद निर्माण झाला असून, कंत्राटदाराकडून पीएफ भरण्यात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक नाविद शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत, कंत्राटदाराने पीएफ भरल्याचा अधिकृत पुरावा सादर करेपर्यंत त्यांची थकीत किंवा चालू बिले अदा करू नयेत, अशी ठाम मागणी केली आहे.


नगरपरिषदेत घंटागाडी विभागात मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. कामगार कायद्यानुसार कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापलेली पीएफची रक्कम आणि स्वतःचा हिस्सा नियमानुसार सरकारी खात्यात जमा करणे बंधनकारक असते. मात्र, प्रत्यक्षात अनेकदा कंत्राटदार कामगारांच्या पीएफची रक्कम न भरता बिले मंजूर करून घेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यासंदर्भात नगरसेवक नाविद शेख यांनी प्रशासनाकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. कंत्राटदाराने मागील महिन्यांचा पीएफ भरल्याची अधिकृत चलन (Challan) व प्रत्येक कर्मचाऱ्याचा किती पीएफ भरला याची सविस्तर यादी सादर केल्याशिवाय त्यांची कोणतीही देयके अदा करू नयेत. तसेच कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
“कामगारांच्या घामाचा पैसा त्यांच्या हक्काच्या पीएफ खात्यात जमा झालाच पाहिजे. कंत्राटदारांच्या मनमानीमुळे गरीब कामगारांचे आर्थिक नुकसान होत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. पारदर्शकतेसाठी पीएफच्या पावत्या तपासल्याशिवाय देयके काढू नयेत,” अशी ठाम भूमिका नाविद शेख यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed